पुराणवाङ्मय

भारतातला सनातन वैदिक धर्म हा श्रुतिस्मृति-पुराणोक्त धर्म मानण्यात आला आहे. म्हणून श्रुती (वेद) व स्मृती यांच्या बरोबरीने पुराणांना वैदिक धर्माच्या दृष्टीने महत्व आहे. प्रपंच आणि परमार्थ हे जीवनाचे ध्येय प्राप्त करण्यास आवश्यक असलेले सारे ज्ञान पुराणग्रंथात रसाळ आणि रोचक पद्धतीने सांगितलेले आढळते. छांदोग्य उपनिषदात चार वेदांच्या बरोबरीने पुराणांचा उल्लेख केला आहे. ख्रिस्तपूर्व ६व्या शतकातल्या धर्मशास्त्रविषयक ग्रंथात पुराणातले आधार दिलेले आढळतात. यावरून पुराण्वाङ्मय हे किती प्राचीन आहे याची कल्पना येते.

सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च ।
वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम्‌ ॥

हे पुराणाचे लक्षण मानण्यात येते. त्यावरून सृष्टीची उत्पत्ती, संहार निरनिराळे मानववंश, मन्वन्तरे आणि थोर राजर्षींच्या वंशाचा इतिहास हे विषय प्राधान्याने पुराणात आढळतात. त्यांच्या आधारानेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांचे प्रतिपादन पुराणग्रंथात केलेले आहे.

पुराणांची एकूण संख्या बरीच मोठी आहे. त्यामध्ये पुढील अठरा पुराणे प्रमुख आहेत. ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. याशिवाय अठरा उपपुराणे आहेत. पुराणांच्या या नामावलीवरून त्यामध्ये शिव, विष्णु व त्यांच्या परिवारातील देवदेवता यांच्या संबंधीचे वृत्तांत असावेत याची कल्पना येऊ शकते. तसेच वेदांचे ज्ञान वाढविण्यासाठी वैदिक विद्वानाने पुराणांचे अध्ययन करण्याची आवश्यकता मानण्यात येते.

इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत्‌ ।

हे वचन यासंबंधात प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार अठरा प्रमुख पुराणांची एकूण श्लोकसंख्या चाळीस लक्षांपेक्षा अधिक मानण्यात येते. अग्निपुराण वपद्मपुराण हे ग्रंथ ज्ञानकोशाप्रमाणे विविध विषयांच्या माहितीने पूर्ण आहेत.

रामायण, महाभारत आणि भागवत या तीन ग्रंथांचे स्वरूप पुराण, इतिहास आणि काव्य या गुणांनी युक्त आहे. अखिल भारतात प्राचीन काळापासून या तीन ग्रंथांचा फार मोठा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येतो. रामायण हा पौराणिक स्वरूपाचा ग्रंथ आदिकवी वाल्मिकीने लिहिला असून त्यात सात कांडात मिळून चोवीस हजार श्लोक आहेत.

महाभारत व भागवत हे ग्रंथ प्राचीन परंपरेनुसार व्यासऋषींनी वेदांची पुनर्व्यवस्था केल्यानंतर आत्मसमाधानासाठी लिहिले.