अतिप्राचीन संस्कृत भाषा
संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची मूळ भाषा आहे. हिचेच दुसरे नाव म्हणजे `देववाणी'. या नावावरुनच तिची अतिप्राचीनता सिद्ध होते. संस्कृत भाषेतील वाङ्मयामध्ये भारताच्या साहित्यिक सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक अध्यात्मिक व राजनीतिक जीवनाचे प्रतिबिम्ब पडलेले दिसते. वेदातील अतिप्राचीन पवित्र रहस्यमय ज्ञानापासून ते सर्वसामान्य जनतेची करमणूक करणाङ्क्षया पंचतंत्रातील गोष्टींपर्यंत सर्वप्रकारचे वैभवसंपन्न साहित्य संस्कृतमध्ये आहे.
वेदांसारखे अतिप्राचीन ग्रंथ ज्यांनी निर्माण केले त्या महान ग्रंथलेखकांबद्दलची खात्रीशीर माहिती मात्र आपल्याला मिळू शकत नाही. ते भारतात कधी आल कोठून आले याबद्दल अनेक मतमतांतरे पहावयास मिळतात. लोकमान्य टिळकांनी आपल्या Arctic home in Vedas या ग्रंथांत आर्य उत्तर ध्रुव प्रदेशातून आले असे मत मांडले आहे.
वेदवाङ्मयाच्या रचनेच्या कालखंडाबाबत इ. स. पूर्व ८०००० पासून इ. स. पूर्व २५०० पर्यंत वेगवेगळे अंदाज संशोधकांनी मांडले आहेत. मात्र सर्वसाधारणपणे खालील अंदाज अधिक योग्य वाटतात.
आर्यजातीचा उत्कर्ष इ. स. पूर्व ६००० ते ४००० या आदियुगात झाला.
वैदिक साहित्याची रचना इ. स. पूर्व ४००० ते २५०० या मृगशीर्षयुगात झाली.
त्यानंतर ब्राहमण आरण्यक व उपनिषदांची रचना इ. स. पूर्व २५०० ते १४०० या काळात म्हणजे वसंतसंपात युगात झाली असावी.