संस्कृत संवर्धन मंडळ

संस्कृत संवर्धन मंडळ
“ तद्दिव्यमव्ययं धाम सातस्वतमुपास्महे । ”
प्रा. भास्कर जोगळेकर (एम्‌. ए.)
अध्यक्ष
श्री. श्रीधर म. साने
कार्याध्यक्ष
जोगळेकर बंगला, आविष्कार चौकाजवळ, विश्रामबाग, सांगली
फोन - २३००७२१
शासनस्य नूतननियमानुसारेण महाविद्यालयेषु संस्कृतविषयः पर्याप्तछात्रसंख्याभावात्‌ निरोधितसः । तथापि भारतीय शिक्षणक्रमे संस्कृतविषयः आधारभूतः ।अतः इतःपरः संस्कृतस्य अध्यापनं व्यक्तिसमूहगतस्वीयप्रयत्नेन एव संचालितच्यम्‌ इति प्राप्तम्‌ । सांगलीस्थितसंस्कृतसंवर्धनमण्डलेन इदं कार्यं अङ्गीकृतम्‌ । प्रारम्भे विंशतिलक्षरुप्यकाणाम्‌ आवश्यकता वर्तते । अतः अस्मत्प्रयत्नमहत्वं संप्रेक्ष्य भवद्भिः उदारमनसा साहाय्यं कर्तव्यम्‌ इति विज्ञप्तिः । अस्य अर्थसाहाय्यस्य आयकरकार्यालयतः 80(G) संज्ञकं संप्रदानं प्राप्तम्‌ ।
शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे महाविद्यालयातील संस्कृत विषय विद्यार्थ्यांच्या अपुर्‍या संख्येमुळे बंद करण्यात येत आहेत. संस्कृत विषय भारतातील अभ्यासक्रमात पायाभूत मानला पाहिजे. यामुळे आता यापुढे संस्कृतचे अध्यापन खाजगी प्रयत्नातूनच चालू ठेवले पाहिजे. संस्कृत संवर्धन मंडळ सांगली या संस्थेचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रारंभी वीस लाख रुपयांचा निधी उभा करण्याचे महत्वाकांक्षी काम हाती घेतले आहे. आमच्या प्रयत्नांचे महत्व ओळखून आपण उदार सहाय्य करावे ही प्रार्थना. त्या निधीस दिल्या गेलेल्या आर्थिक सहाय्यास सवलत प्राप्त आहे.
निवेदन
‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू अण्ड मोहॅमिडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशीचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ‌ ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.

हा थोर पंडित म्हणतो, ‘ संस्कृत भाषेची प्राचीनता क्षणभर बाजूला ठेवू. तिची घटना आश्चर्यकारक आहे. ती ग्रीक भाषेहून बांधेसूद, लॅटिनहून समृद्ध, आणि दोहोंपेक्षा प्रौढ व परिष्कृत आहे. ’ जोन्सच्या या विधानाची सत्यता गेल्या दीडशे वर्षात झालेल्या भाषाशास्त्राच्या विकासाने सिद्ध झाली आहे.

संस्कृत ही सर्व भाषांची मोठी बहीण आहे. कोणी कोणी तर संस्कृतला भारतीय भाषांची जननीच मानतात. अभिजात संस्कृत वाङ्मयात प्रतिबिंबित झालेली ही संस्कृत भाषा ही आजही भारताच्या घटनेने मान्यता दिलेल्या भाषांपैकी एक आहे. शब्दसंपदा आणि विचारसंपदा यांनी प्रमुख अर्वाचीन भारतीय, इतकेच काय पण भारताबाहेरील काही देशातील भाषांचे शतकानुशतके पोषण करणारा हा चिरंतन मूलस्रोत आहे. त्यामुळे संस्कृत भाषा आणि संस्कृत साहित्य यांना अखिल भारतीय आणि बृहद्‌भारतीय महत्व आहे. जागतिक विद्याक्षेत्रात संस्कृतला इंग्रजीइतकेच मानाचे स्थान आहे कारण युरोभारतीय भाषातील ती एक अग्रगण्य ज्येष्ठ भाषा आहे. भारताचा मानबिंदू असलेल्या ‘ वन्दे मातरम्‌ ’ या गीताची पहिली दोन कडवी संस्कृत भाषेत आहेत आणि तेवढ्या दोन कडव्यांनाच ‘ राष्ट्रगीत ’ अशी मान्यता भारतभर आहे.

पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाची बांधणी सामान्यविशेषन्यायाने तसेच उत्सर्गापवादन्यायाने केलेली आहे. आधुनिक software ची बांधणीही तशीच आहे असे ऎकतो. तसे असेल तर संस्कृत व्याकरण आणि software यांची तर्कपद्धती एकच आहे. त्यामुळे संस्कृत भाषेचा पुढेमागे आज आपल्या कल्पनेतही नसलेला उपयोग सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आजकाल शाळांमध्ये पुष्कळ विद्यार्थी संस्कृत घेतात. कारण संस्कृतमध्ये शेकडा ९० पर्यंत गुण सहज मिळतात. शिवाय आयुर्वेदिक डॉक्टर (बी. ए. एम्‌. एस्‌. ) होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना तर संस्कृत यावेच लागते. त्यामुळे मोठ्या शाळांमध्ये तर आज संस्कृत शिकविण्याची सोय असतेच. इतकेच काय पण खेडोपाडीच्या शाळाही आज संस्कृत शिकविण्याची सोय करू इच्छितात. संस्कृत संवर्धन मंडळ, सांगली यांचेकडे यासंदर्भात दरवर्षी विचारणा होत असते. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुद्धा संस्कृत विषय शिकविण्याची सोय करणे भाग पडते.
यासाठी संस्कृतची आवड निर्माण करणारे तसेच मुळात विद्यार्थ्याला संस्कृतची आवड असेल तर ती वृद्धिंगत करू पाहणारे शिक्षक उपलब्ध होणे जरुरीचे आहे. यासाठी संस्कृत विषय घेऊन पदवी मिळविलेले व संस्कृत वाङ्मयाची व व्याकरणाची समज असलेले चांगले शिक्षक मिळणे आवश्यक आहे. पण मध्ये सुमारे २५ ते ३० वर्षे महाराष्ट्रामध्ये संस्कृतशिक्षणच बंद होते. त्यामुळे महाविद्यालयातील अध्यापनच बंद पडले. त्यामुळे पदवीअखेर संस्कृत अध्यापन असलेली महाविद्यालयेच नाहीशी झाली आहेत.
उदाहरणार्थ शिवाजी विद्यापीठाचाच विचार केला तर सातार्‍याखेरीज दुसर्‍या गावात ही सोय असलेले महाविद्यालय नाही आणि संस्कृत विषय घेऊन पदवी घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला विशेशतः विद्यार्थिनीला आपल्या गावातून उठून बाहेरगावी जाऊन शिकणे बहुधा शक्य नसते. त्यामुळे महाविद्यालयात संस्कृत विषयाचे अध्यापन नाही म्हणून पदवी परीक्षेला संस्कृत विषय घेतलेले, व्याकरणाची चांगली समज असलेले शिक्षक नाहीत असे त्रांगडे हल्ली निर्माण झाले आहे.

याच्या कारणाचा आम्ही मागोवा घेतला. त्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या भेटी घेतल्या. त्यातून आम्हास असे समजले की, प्रथमवर्ष पदवी इयत्तेला संस्कृत विषय घेणारे किमान २४ विद्यार्थी असले आणि ही संख्या सतत तीन वर्षे असली तरच सरकारी अनुदान (ग्रॅंट) उपलब्ध होते. संस्कृत विषय घेऊ इच्छिणारे विद्यार्थी असतात पण ते इतक्या संखेने असत नाहीत. त्यामुळे महाविद्यालये नव्याने संस्कृत विषयाचे अध्यापन सुरू करू शकत नाहीत.

याला उपाय विना अनुदान पद्धतीने संस्कृत विषयाचे शिक्षण सुरु करणे हा आहे. दोन प्राध्यापकांच्या स्थिर वेतनाची सोय केली गेली तर महाविद्यालये हा विषय सुरु करण्यास तयार आहेत. विना अनुदान पद्धतीने दोन प्राध्यापकांचे स्थिर वेतन दर वर्षास सुमारे एक लाख वीस हजार रूपये होते. एवढे व्याज येईल इतकी रक्कम संस्कृतप्रेमींनी उभी केल्यास विना अनुदान पद्धतीने संस्कृतच्या पदवी आणि पदव्युत्तर अध्यापनाची सोय होऊ शकेल. हल्ली व्याजाचे दर कमी झाले आहेत आणि ते अधिक कमी होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे ही उभी करावयाची रक्कम सुमारे वीस लाख रुपये होते. पण तरी सुद्धा सांगली येथील संस्कृत संवर्धन मंडळाने हे काम करावयाचे ठरविले आहे आणि प्रयत्न सुरू केले आहेत. काही रक्कम जमली आहे. काही आश्वासने मिळाली आहेत त्यातून या वर्षीपासून (२००५) येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे मदतीने प्रथम वर्षाच्या संस्कृत विषयाचे अध्यापन आम्ही सुरू केले आहे.

याप्रमाणे संस्कृत भाषेचे बंद झालेले महाविद्यालयीन अध्यापन निदान सांगलीमध्ये तरी सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास तो पथदर्शक होईल. इतर ठिकाणीही याच पद्धतीने संस्कृत अध्यापन सुरू होऊ शकेल. आमचा जनसंपर्क तोकडा आहे. आमचे सामर्थ्य थिटे आहे. पण आपणासारखे उदारधी आमच्या सहाय्यास उभे राहिले तर हे काम अशक्य नाही. तरी संस्कृत संवर्धन मंडळास जास्तीत जास्त सहाय्य करावे. हा गोवर्धन पर्वत तुमच्या समर्थ करंगळीनेच उचलला जाणार आहे.

आपला चेक \ ड्राफ्ट संस्कृत संवर्धन मंडळ, सांगली या नावाने पाठवावा. या कामी जशजशी प्रगती होईल तसतशी ती आपणास आम्ही कळवू इच्छितो, जास्तीत जास्त सहाय्य आपंणाकडून व्हावे. तसेच आणखी काही संस्कृतप्रेमी आपणास माहीत असतील तर त्यांचेही पत्ते कळले तर त्यांचेशीही संपर्क ठेवू. आमच्या मंडळास सहाय्य करावे ही पुनः प्रार्थना.
अध्यक्ष