ज्ञानदीप मंडळ

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ’ज्ञानदीप मंडळ’ सुरू करण्याचा संकल्प ज्ञानदीप नववर्षानिमित्त करीत आहे. या योजनेत शाळेतील संगणकाचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संगणकावर मराठी टाईप करणे, माहितीचा शोध घेणे, इ मेल व ब्लॉग सुरू करणे इत्यादी माहिती ज्ञानदीपतर्फे देण्यात येईल. विविध विषयांवर असणार्‍या शैक्षणिक ध्वनी चित्रफितींची माहिती देण्यात येईल.

शिक्षण प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरून आपणास हे ज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफिती व चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांना माहिती असते.

आज माहितीचा हा साठा मुख्यत्वे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे त्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व विषयाच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप मंडळात सहभागी होता यॆईल. मात्र विज्ञान शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व अधिक माहिती असल्याने त्यांनी या उपक्रमात पुढाकार घेतल्यास ज्ञानदीप मंडळाचे कार्य यशस्वी होऊ शकेल. ज्ञानदीप फौंडेशन आपणास याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल.

भोवतालच्या समाजातील विविध समस्यांचा शोध घेणॆ व त्यावर प्रभावी उपाय शोधण्याचे कार्य शिक्षक व विद्यार्थी इंटरनेट्च्या माध्यमातून सहज करू शकतील. ही माहिती देऊन शाळा आपल्या भोवतालच्या विकासात भरीव योगदान देऊ शकेल. उपलब्ध संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमास पूरक माहिती मराठीत टाईप केली तर मराठीत अशा ज्ञानसाठ्यात वाढ होईल व हा साठा संकेतस्थळाच्या माध्यमातून इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल. इंटरनेटची सुविधा नसलेल्य़ा शाळातील संगणकावर ही माहिती स्थापित करण्याचे कार्य ज्ञानदीप फौंडेशनतर्फे करण्यात येईल.

शाळांना या योजनेचा उपयोग अर्थसाहाय्य मिळविण्यासही करता येईल. अनेक उद्योजक व व्यावसायिक यांना इंटरनेटवर त्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा उपलब्ध ज्ञानाविषयी कल्पना नसते वा त्यांना अशा माहितीचा शोध घेण्यास वेळ नसतो. ज्ञानदीपच्या मंडळातील विद्यार्थ्यांनी नियमितपणे अशा माहितीचा शोध घेऊन ती स्कॅन वा झेरॉक्स करून संबंधितांपर्यंत पोहोचविली तर त्यातून शाळेस आर्थिक लाभ होऊ शकेल. शिवाय विद्यार्थ्यांना नव्या माहितीची ओळख होईल. मराठी टायपिंग, मराठीत भाषांतर, तसेच संगण्क शिक्षणाचे सशुल्क वर्गही शाळेस ज्ञानदीप मंडळामार्फत चालविता येतील.

ज्ञानदीप मंडळांचे कार्य प्रसिद्ध करण्यासाठी तसेच शाळा, शिक्षक, विषय तज्ञ यांच्यात परस्पर सुसंवाद व सामुहिक कार्यास मदत करण्यासाठी www.school4all.org ह्या संकेतस्थळाचा उपयोग करण्यात येणार आहे. सध्या या संकेतस्थळावर असणार्‍या सुविधां अधिक विकसित करण्यात येत असून त्यावर सहभागी शाळा, शिक्षक, व विषय तज्ञ यांची माहिती विनामूल्य देण्यात येणार आहे.

यापूर्वी मराठी, संस्कृत व विज्ञान या विषयांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळांची निर्मिती केली आहेच. आता इतिहास, भूगोल, गणित, चित्रकला इत्यादी विषयांची माहिती संकलित करण्यात येईल.school4all.org या संकेत स्थळासाठी सध्या प्रामुख्याने मराठी माध्यम वापरले आहे मात्र आवश्यकता भासल्यास व पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास तेथे इंग्रजी व अन्य भाषांचाही समावेश करण्यात येईल . .

या प्रकल्पाचा आवाका मोठा असल्याने आपण सर्वांनी या उपक्रमास सक्रीय सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या पाहण्यात आलेल्या शिक्षणविषयक मोफत माहिती देणार्‍या संकेत स्थळांचे पत्ते कळविणे, स्वतः लेख, चित्रे वा माहिती पाठविणे, उपयुक्त सूचना करणे, चुका दर्शविणे असे सहकार्य मिळाल्यास या संकेतस्थळाची व्याप्ती लवकर वाढू शकेल. स्पर्धा, प्रश्नोत्तरे व शिक्षणविषयक घटना व कार्यक्रम यांनाही या संकेतस्थळांवरून प्रसिद्धी देण्यात येईल.







ज्ञानदीप मंडळ स्थापन करून शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञानदीप फौंडेशन सर्वांना करीत आहे.