संस्कृतपरिचय भाग -४

क्रियापदाचे रुप = मूळधातू + विकरण + प्रत्यय
पठति = पठ् + अ + ति

तृतीय पुरुषाची एकवचन, द्विवचन, बहुवचन ही तीनही रुपे पुंलिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंगी कर्ता असला तरी सारखीच असतात. त्यामुळे पाठ करताना ती एकदाच म्हणावी लागतात. तसेच कंसात दिलेली कर्त्यांची रुपे पण वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थात समानच असतात. ती गृहीत धरलेली असतात. तसेच प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष हेही सर्वत्र समान असल्याने तेही प्रत्येकवेळी म्हणावे लागत नाही.

पठामि, पठाव:, पठाम:
पठसि, पठथ:, पठथ
पठति, पठत:, पठन्ति
या प्रमाणे एकाखाली एक अशा तीन ओळी लक्षात ठेवाव्यात.

उदाहरणादाखल प्रथम गणाच्या पठ् (पठति) = वाचणे ह्या धातूची रुपे खालील प्रमाणे होतात.

एकवचन द्विवचन बहुवचन

प्रथम पुरुष (अहं) पठामि (आवां) पठाव: (वयम्) पठाम:
(मी वाचतो) (आम्ही दोघे वाचतो) (आम्ही सर्वजण वाचतो)
द्वितीय पुरुष (त्वं) पठसि (युवां) पठथ: (यूयं) पठथ
(तू वाचतोस) (तुम्ही दोघे वाचता) (तुम्ही सर्वजण वाचता)
तृतीय पुरुष (स:) पठति (तौ) पठत: (ते) पठन्ति
(तो वाचतो) (ते दोघे वाचतात) (ते सर्वजण वाचतात)
(सा) पठति (ते) पठत: (ता:) पठन्ति
(ती वाचते) (त्या दोघी वाचतात) (त्या सर्वजणी वाचतात)
(तद्) पठति (ते) पठत: (तानि)पठन्ति
(ते वाचते) (ती दाघे वाचतात) (ती सर्वजण वाचतात)

 

काही धातूंच्या मूळ रुपात थोडा बदल करुन नंतर विकरण लावले जाते. हा बदल ठरवून दिलेला असतो. या बदलाला `आदेश' असे म्हणतात.

उदा. मूळधातू - गम्, आदेश - गच्छ्
गच्छति = गच्छ् + अ + ति

धातूंना आदेश असेल तर तो त्यांचा मूळ रूपाच्या पुढे कंसात लिहून दाखविला जातो. गम् (गच्छ्). केवळ माहीत असावेत म्हणून प्रत्यय दिलेले आहेत. ते स्वतंत्रपणे पाठ परण्याची गरज नसते.

वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ असे चार वेगवेगळे प्रकारचे प्रत्यय असतात. पण १, ४, ६, १० या चारही गणातील धातूंना लागणारे हे सर्व प्रत्यय समानच असतात. फक्त विकरण वेगवेगळे असते.

प्रथम भूतकाळ (अनद्यतन भूतकाळ) - ही रुपे करताना धातूच्या मूळरूपापूर्वी `अ' लावला जातो.
प्रथम भूतकाळाचे प्रत्यय -
एकवचन द्विवचन बहुवचन

प्रथम पुरुष अम् व म
द्वितीय पुरुष स् तम् त
तृतीय पुरुष त् ताम् अन्

आज्ञार्थ -
आज्ञार्थाचा उपयोग हुकूम, आज्ञा, विनंती, इच्छा इत्यादी अनेक अर्थ व्यक्त करण्यासाठी होतो.

आज्ञार्थाचे प्रत्यय -
एकवचन द्विवचन बहुवचन

प्रथम पुरुष आनि आव आम
द्वितीय पुरुष - तम् त
तृतीय पुरुष तु ताम् अन्तु

आज्ञार्थी द्वितीय पुरुषी एकवचनाचा परस्मैपदी प्रत्यय `हि' आहे. परंतू १, ४, ६, १० या गणात त्याचा लोप होता. त्यामुळे तेथे कोणताही प्रत्यय लावला जात नाही.

विध्यर्थ -
विध्यर्थाचा उपयोग विनंती, इच्छा, प्रार्थना, शक्यता तसेच भविष्यकाळ दर्शविण्यासाठी केला जातो.

विध्यर्थाचे प्रत्यय -
एकवचन द्विवचन बहुवचन

प्रथम पुरुष इयम् इव इम
द्वितीय पुरुष इ: इतम् इत
तृतीय पुरुष इत् इताम् इयु: