संस्कृतपरिचय भाग -३
विकरण - ज्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्न्नचा स्वत:चा स्वतंत्र ध्वज असतो, त्याप्रमाणे प्रत्येक धातूला स्वत:ची अशी ओळखण्याची खूण ठरवून दिलेली आहे. या खुणेलाच `विकरण' असे म्हणतात. प्रथम धातूंची रूपे करताना मूळ धातूला विकरण जोडून प्रथम धातूचे अंग तयार केले जाते व नंतर त्याला त्या त्या काळाप्रमाणे आणि अर्थानुसार प्रत्यय लावले जातात.
पहिल्या गटातील धातू व त्यांचे विकरण पुढील प्रमाणे-
गण विकरण
प्रथम अ
चतुर्थ य
षष्ठ अ
दशम अय
दुसऱ्या गटातील धातू व त्यांचे विकरण पुढील प्रमाणे-
गण विकरण
व्दितीय विकरण नाही
तृतीय धातूला व्दित्व
पंचम नु
सप्तम न
अष्टम उ
नवम ना
प्रथम व षष्ठ गणाचे विकरण `अ' हे समान आहे. परंतु षष्ठ गणातील `अ' या विकरणामुळे धातूमधील उपान्त्य स्वरात कोणताही बदल घडवून आणला जात नाही. त्यामुळे त्याला अविष्कारक (बदल घडवून न आणणारे ) विकरण असे म्हणतात. प्रथम गणातील `अ' विकरणामुळे मात्र धातूंच्या उपान्त्य स्वरात बदल घडवून आणला जातो. म्हणून त्याला विकारक (बदल घडवून आणणारे) विकरण असे म्हणतात. षष्ठ गणातील धातू संख्येने कमी आहेत. त्यामुळे केवळ पुन्हा पुन्हा वाचण्याने ते लक्षात ठेवले जातात.
काळ - वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन ती क्रिया केव्हा घडली ते समजते. म्हणजे फळ पडते. या वाक्यातील क्रियापदावरुन विधान करण्याच्या वेळी म्हणजे `वर्तमानकाळी' क्रिया घडते असे समजते. या वाक्यातील क्रियापदावरुन विधान करण्याच्या वेळेपूर्वी म्हणजे भूतकाळी पडण्याची क्रिया घडली असे कळते. या वाक्यातील क्रियापदावरुन विधान करण्याच्या वेळेनंतर म्हणजे भविष्यकाळी पडण्याची क्रिया घडणार असल्याचे समजते. याप्रमाणे क्रियापदाच्या रुपावरुन त्याचा वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ समजतो. तसेच क्रियापदाच्या रुपावरुन इच्छा, आज्ञा, विनंती, उपदेश, शक्यता इत्यादी गोष्टी सुध्दा समजतात. त्यांना अर्थ असे म्हणतात. संस्कृत भाषेत आज्ञार्थ, विध्यर्थ, आशीर्वादार्थ व संकेतार्थ असे चार अर्थ आहेत. त्यापैकी आज्ञार्थ व विध्यर्थ यांचाच वापर अधिक प्रमाणात केला जातो. वर्तमानकाळ, भूतकाळ (अनद्यतन किंवा प्रथम भूतकाळ), आज्ञार्थ व विध्यर्थ याची रुपेच अभ्यासाला किंवा पाठांतरासाठी असतात.
वर्तमानकाळाचे प्रत्यय -
एकवचन द्विवचन बहुवचन
प्रथम पुरुष मि व: म:
द्वितीय पुरुष सि थ: थ
तृतीय पुरुष ति त: अन्ति
क्रियापदाचे रुप = मूळधातू + विकरण + प्रत्यय
पठति = पठ् + अ + ति
उदाहरणादाखल प्रथम गणाच्या पठ् (पठति) = वाचणे ह्या धातूची रुपे खालील प्रमाणे होतात.
एकवचन | द्विवचन | बहुवचन | |
प्रथम पुरुष | (अहं) पठामि | (आवां) पठाव: | (वयम्) पठाम: |
(मी वाचतो) | (आम्ही दोघे वाचतो) | (आम्ही सर्वजण वाचतो) | |
द्वितीय पुरुष | (त्वं) पठसि | (युवां) पठथ: | (यूयं) पठथ |
(तू वाचतोस) | (तुम्ही दोघे वाचता) | (तुम्ही सर्वजण वाचता) | |
तृतीय पुरुष (पुंलिंग) | (स:) पठति | (तौ) पठत: | (ते) पठन्ति |
(तो वाचतो) | (ते दोघे वाचतात) | (ते सर्वजण वाचतात) | |
तृतीय पुरुष (स्त्रीलिंग) | (सा) पठति | (ते) पठत: | (ता:) पठन्ति |
(ती वाचते) | (त्या दोघी वाचतात) | (त्या सर्वजणी वाचतात) | |
तृतीय पुरुष (नपुंसकलिंग) | (तद्) पठति | (ते) पठत: | (तानि)पठन्ति |
(ते वाचते) | (ती दोघे वाचतात)) | (ती सर्वजण वाचतात) |
तृतीय पुरुषाची एकवचन, द्विवचन, बहुवचन ही तीनही रुपे पुंलिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंगी कर्ता असला तरी सारखीच असतात. त्यामुळे पाठ करताना ती एकदाच म्हणावी लागतात. तसेच कंसात दिलेली कर्त्यांची रुपे पण वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थात समानच असतात. ती गृहीत धरलेली असतात. तसेच प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष हेही सर्वत्र समान असल्याने तेही प्रत्येकवेळी म्हणावे लागत नाही.
पठामि, पठाव:, पठाम:
पठसि, पठथ:, पठथ
पठति, पठत:, पठन्ति
या प्रमाणे एकाखाली एक अशा तीन ओळी लक्षात ठेवाव्यात.
काही धातूंच्या मूळ रुपात थोडा बदल करुन नंतर विकरण लावले जाते. हा बदल ठरवून दिलेला असतो. या बदलाला `आदेश' असे म्हणतात.
उदा. मूळधातू - गम्, आदेश - गच्छ्
गच्छति = गच्छ् + अ + ति
धातूंना आदेश असेल तर तो त्यांचा मूळ रूपाच्या पुढे कंसात लिहून दाखविला जातो. गम् (गच्छ्). केवळ माहीत असावेत म्हणून प्रत्यय दिलेले आहेत. ते स्वतंत्रपणे पाठ करण्याची गरज नसते.