विसर्गसंधी
विसर्गसंधी - विसर्गापूर्वी नेहमी स्वरच असतो. विसर्गानंतर मात्र स्वर किंवा व्यंजन कोणताही वर्ण असू शकतो. १. विसर्गाचा उ - विसर्गापूर्वी ‘अ’ आणि विसर्गानंतर ‘अ’ आल्यास विसर्गाचा ‘उ’ होता. विसर्गापूर्वीचा ‘अ’ व विसर्गाचा ‘उ’ यांचा गुणसंधिनियमानुसार ‘ओ’ होतो. पुढील ‘अ’ चा लोप होतो. लोप झालेल्या ‘अ’ च्या जागी अवग्रह (ऽ) चिन्ह वापरतात. धूर्तः + अवदत् = धूर्त + उ + अवदत् = धूर्तो अवदत् = धूर्तोऽवदत् २. विसर्गाचा उ - विसर्गापूर्वी ‘अ’ आणि विसर्गानंतर मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ असा बदल होऊन मागील ‘अ’ व ‘उ’ यांचा गुणसंधिनियमानुसार ‘ओ’ होता. अर्थः + हि = अर्थो हि ३. विसर्गाचा लोप - तीन वेगवेगळया कारणांमुळे विसर्गाचा लोप होतो. (विसर्ग नाहीसा होता) अ) विसर्गापूर्वी ‘अ’ व विसर्गापुढे ‘अ’ खेरीज कोणताही स्वर आल्यास विसर्गाचा लोप होता. बालः + इच्छति = बाल इच्छति आ) विसर्गापूर्वी ‘आ’ व नंतर कोणताही स्वर अथवा मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा लोप होता. बालिकाः + अपि = बालिका अपि इ) ‘एषः’ व ‘सः’ यांच्या पुढे ‘अ’ शिवाय कोणताही वर्ण (स्वर किंवा व्यंजन) आल्यास विसर्गाचा लोप होतो. त्यांचा पुन्हा स्वरसंधी होत नाही. एषः + कविः = एष कविः ४. विसर्गाचा र् - विसर्गाच्या मागे ‘अ’, ‘आ’ खेरीज कोणताही स्वर किंवा मृदुव्यंजन आल्यास त्या विसर्गाचा ‘र्’ होतो. पुढे स्वर आल्यास ‘र्’ मध्ये मिसळून पूर्ण अक्षर बनते व मृदुव्यंजन असल्यास ‘र्’ त्या व्यंजनावर लिहितात. रविः + अपि = रवि + र् + अपि = रविरपि ५. विसर्गाचा श - विसर्गाच्या मागे कोणताही स्वर व विसर्गापुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास विसर्गाचा ‘श्’ होतो. परंतु विसर्गापुढे ‘श्’ आल्यास त्याचा विकल्पाने ‘श्’ होतो. पुत्राः + च = पुत्राश्च ६. विसर्गाचा ष् - विसर्गापुढे ‘ट्’, ‘ठ्’ आल्यास विसर्गाचा ‘ष्’ होतो. परंतू विसर्गापुढे ‘ष्’ आल्यास त्याचा विकल्पाने ‘ष्’ होतो. ७. विसर्गाचा स् - विसर्गापुढे ‘त्’, ‘थ्’ आल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो. परंतु विसर्गापुढे ‘स्’ आल्यास विसर्गाचा विकल्पाने ‘स्’ होतो. गङ्गायाः + तटे = गङ्गायास्तटे ८. विसर्गापुढे ‘क्’, ‘ख्’, ‘प्’, ‘फ्’ पैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो. |