संस्कृत उतार्‍यांचे भाषांतर (७-८)

७) संस्कृत -
अस्ति कस्मिंचिद्वनोद्देशे मदोन्मत्तो नाम सिंहः, योऽजस्रमेव मृगोत्सादनं कुरुते । अथ ते मृगाः सर्व एव एक मिलित्वा विनयेन तं मृगराजं विज्ञापितवन्तः । देव, किमनेन निष्कारणकृतेन सर्वमृगोत्सादनकर्मणा । वयं विनष्टा भविष्यामः । तवाप्याहाराभावः । तत्प्रसीद वयमेव त्वदाहारार्थमेकैकं वनचरं प्रत्यहं प्रेषयिष्यामः इति । एवमस्तु इत्युक्त्वा ततः प्रभृति स प्रतिदिनं तैः प्रेषितमेकैकं मृगं भक्षयति ।

मराठी -
एका अरण्यप्रदेशात मदोन्मत्त नावाचा सिंह रहात असे. तो अखंडपणे पशूंचा संहार करीत असे. एकदा ते सर्व पशु एकत्र मिळून नम्रतेने सिंहाला विनंती करते झाले (त्यांनी विनंती केली). “महाराज, पशूंचा हा सतत व अकारण संहार कशासाठी? (याचा काय उपयोग?) आम्ही सर्व नष्ट होऊ. तुम्हालाही अन्न राहणार नाही. तेव्हा कृपा करा. आम्ही स्वतःहून आपल्या भक्षणाकरिता एकेक वन्यपशूला दररोज तुमच्याकडे पाठवू.” “ठीक आहे.” असे म्हणून तो तेव्हापासून त्यांनी पाठविलेल्या एकेक पशूला खात असे.

८) संस्कृत -
अस्ति ब्रह्मारण्ये कर्पूरतिलको नाम हस्ती । तमवलोक्य सर्वे शृगालाश्चिन्तयन्ति स्म । यद्ययं केनाप्युपायेन म्रियते, तदास्माकमेतद्देहेन मासचतुश्ठस्य भोजनं भविष्यति । तत्रैकेन वृद्धशृगालेन प्रतिज्ञातम्‌ । “मया बुद्धिप्रभावादस्य मरणं साधयितव्यम्‌” । अनन्तरं स वञ्चकः कर्पूरतिलकसमीपं गत्वा साष्टाङ्गपातं प्रणम्योवाच _ “देव दृष्टिप्रसादं कुरु” । हस्ती ब्रूते “कस्त्वम्‌? कुतश्च समायातः?”

मराठी -
ब्रह्मारण्यात कर्पूरतिलक नावाचा हत्ती रहात होता. त्याल पाहून सर्व कोल्हे विचार करु लागले, “हा (हत्ती) कोणत्या तर उपायाने (कारणाने) मेला तर याच्या शरीराने आम्हाला चार महिने अन्न पुरेल. (याच्या शरीरापासून आम्हाला चार महिने पुरेल एवढे अन्न मिळेल.)” तेव्हा एका वृद्ध कोल्ह्याने प्रतिज्ञा केली, “माझ्या बुद्धिसामर्थ्यावर मी याचे मरण साधतो (घडवून आणू शकतो.)” नंतर तो (धूर्त) कोल्हा कर्पूरतिलकाजवळ जाऊन व साष्ठांग नमस्कार घालून म्हणाला, “महाराज, माझ्यावर कृपाकटाक्ष टाकावा. (माझ्याकडे नजर वळवावी.)” हत्ती म्हणाला, “कोण तू? कोठून आलास?”