व्यंजनसंधी
व्यंजनसंधीच्या सर्व प्रकारात दोन पदांचा संधी होताना पहिल्या पदाच्या शेवटी कोणते ना कोणतेतरी व्यंजनच येते. १. अनुनासिकाखेरीज इतर कोणत्याही वर्गीय (क्, च्, ट्, त्, प्, वर्गातील) व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येते. एतद् + त्वया = एतत्त्वया २. अनुनासिकाखेरीज इतर कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे जर स्वर किंवा मृदु व्यंजन आले तर आधीच्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. उदा. वाक् + ईश्वरः = वागीश्वरः ३. शब्दाच्या शेवटी येणार्या अनुनासिकाखेरीज वर्गीय व्यंजनापुढे जर अनुनासिक आले तर अगोदरच्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक किंवा तिसरे व्यंजन विकल्पाने येते. वाक् + निश्चय = वाङ्निश्चय किंवा वाग्निश्चय ‘मय’ व ‘मात्र’ यासारखे प्रत्यय लावताना वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिकच येते. विकल्पाने तिसरे व्यंजन येत नाही. ४. ‘त्’ वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे ‘च्’ वर्गातील कोणतेही व्यंजन किंवा ‘श्’ आला असता पूर्वीच्या त् वर्गातील व्यंजनाच्या जागी त्याच क्रमाने च् वर्गातील व्यंजन येते. केवळ ‘श्’ पुढे आला असता ‘श्’ चा विकल्पाने ‘छ्’ होतो. तस्मात् + चलति = तस्माच् + चलति = तस्माच्चलति ५. ‘त्’ वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे ‘ट्’ वर्गातील कोणतेही व्यंजन आले असता ‘त्’ वर्गातील व्यंजनाच्या जागी ‘ट्’ वर्गातील व्यंजन त्याच क्रमाने येते. उद् + डयनम् = उड्डयनम् ६. पदाच्या अंती असणार्या ‘न्’ व्यंजनापूर्वी र्हस्व स्वर व पुढे कोणताही स्वर आला असता त्या ‘न्’ ला द्वित्व होते. अनिच्छन् + अपि = अनिच्छन्नपि परंतु ‘न्’ व्यंजनापूर्वी जर दीर्घ स्वर असेल तर ‘न्’ ला द्वित्व होत नाही. देवान् + इव = देवानिव ७. पदाच्या अंती असणार्या ‘न्’ व्यंजनापुढे ‘त्’, ‘थ्’, ‘च्’, ‘छ्’ किंवा ‘ट्’, ‘ठ्’ आले असा त्या ‘न्’ चा अनुस्वार व विसर्ग दोन्ही होतात. अनुस्वार हा अगोदरच्या अक्षरावर टिंब देऊन दाखविला जातो. नंतर विसर्गसंधीच्या नियमानुसार ‘त्’ ‘थ्’ पुढे असता विसर्गाचा ‘स्’ होतो. ‘च्’, ‘छ्’ पुढे असता विसर्गाचा ‘श्’ होतो. ‘ट्’, ‘ठ्’ पुढे असता विसर्गाचा ‘ष्’ होतो. वृक्षान् + तान् = वृक्षां: + तान् = वृक्षांस्तान् ८. पदाच्या अंती असणार्या ‘त्’ वर्गीय व्यंजनापुढे ‘ल्’ व्यंजन आल्यास ‘त्’ वर्गीय व्यंजनाऎवजी ‘ल्’ हे व्यंजन येते. जर पूर्वीचा वर्ण ‘न्’ अस्तो तेव्हा त्याऎवजी येणारा ‘ल्’ हा ‘लँ’ (अनुनासिक युक्त ‘ल्’) होतो. त्यातील अनुनासिक ( ँ) हे चिन्ह अगोदरच्या स्वरावर देतात. नृपात् + लभते = नृपाल्लभते ९. अनुनासिकाखेरीज पदाच्या शेवटी असलेल्या कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे ‘ह्’ व्यंजन आल्यास त्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते व ‘ह्’ च्या जागी मागील व्यंजनाच्या वर्गातील चौथे व्यंजन विकल्पाने येते. वाक् + हरेः = वाग्घरेः किंवा वाग्हरेः १०. कोणत्याही र्हस्व स्वरापुढे किंवा ‘आ’ ह्या उपसर्गापुढे (किंवा अव्ययापुढे) ‘छ्’ व्यंजन आल्यास त्या ‘छ्’ च्या मागे ‘च्’ व्यंजन जोडले जाते. तरु + छाया = तरुच्छाया परंतु दीर्घ स्वरापुढे ‘छ्’ व्यंजन आले तर त्याच्या मागे ‘च्’ व्यंजन विकल्पाने लावतात. |