संस्कृत परिचय भाग -२

१. वाक्य - माणसांचे विचार एकमेकांना कळविण्याचे प्रमुख साधन म्हणजे भाषा हे होय. बोलणाऱ्याच्या मनातील विचार वाक्यामधून व्यक्त होतो. वाक्य हे एक किंवा अनेक शब्दांचे मिळून बनलेले असते. नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय, क्रियापद असे वाक्याचे विविध भाग असतात. त्यातील क्रियापद या प्रमुख भागाचा आपण अगोदर विचार करु.

२. धातू - क्रियापदाच्या मूळ रुपाला धातू असे म्हणतात. धातूंचे १ ते १० असे दहा गट केलेले आहेत. त्यांनाच `गण' असे म्हणतात. त्यांची वर्गवारी दोन प्रकारात केलेली आहे. पहिल्या प्रकारात १, ४, ६, १० या गणातील धातू येतात. तर दुसऱ्या प्रकारात २, ३, ५, ७, ८, ९ या गणातील धातू येतात.

धातूंचे एकूण १० गण
पहिला प्रकार - १, ४, ६, १०
दुसरा प्रकार - २, ३, ५, ७, ८, ९

या नंतर प्रत्येक गणाचे आणखी एका पध्दतीने वर्गीकरण केलेले असते.
१.     परस्मैपद २. आत्मनेपद ३. उभयपद

 

प्रत्येक धातू वरील तीन प्रकारांपैकी कोणत्या तरी एका प्रकारचा असतो.

प्रत्यय - धातू हा मूळ रुपात आहे तसा वाक्यात क्रियापद म्हणून वापरला जात नाही. धातूला ठराविक अक्षरांची जोड द्यावी लागते. धातूच्या पुढे लाावल्या जाणाऱ्या ह्या अक्षरांनाच `प्रत्यय ' असे म्हणतात. जसे मराठीमधील `करणे ' हे मूळ क्रियापद आपण बोलताना किंवा लिहिताना आहे तसे वापरत नाही. तर त्याला काही ठराविक प्रत्यय लावतो. उदा. - करते, करतो, केले, कर, करीन, करतील इत्यादी. तसेच शब्द सुद्धा आपण आहे त्या स्वरूपात वापरत नाही. त्यांना सुद्धा विशिष्ट अर्थ सांगण्यासाठी विशिष्ट प्रत्यय लावले जातात. उदा. - `फळ 'हा मूळ शब्द असला तरी तो आहे तसा आपण वापरत नाही. तर फळे, फळाला, फळाने, फळांपासून, फळाचा इत्यादी.

प्रत्येक गणासाठी त्याला १. परस्मैपद २. आत्मनेपद ३. उभयपद असे वेगवेगळे प्रत्यय लावले जातात. ज्याप्रमाणे काही शाळांमध्ये विद्यार्थी (फक्त मुले ) असतात. तर काही शाळांमध्ये विद्यार्थिनी (फक्त मुली) असतात. मात्र काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही असतात. त्याप्रमाणे प्रत्ययांच्या प्रकारानुसार प्रत्येक धातूची विभागणी केलेली असते. फक्त परस्मैपदाचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना `परस्मैपदी धातू ' असे म्हणतात. तर फक्त आत्मनेपदाचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना `आत्मनेपदी धातू ' असे म्हणतात. परस्मैपदी प्रत्यय व आत्मनेपदी प्रत्यय असे दोन्ही प्रत्यय लागणाऱ्या धातूंना `उभयपदी धातू 'म्हणतात.

वचन - सर्व भाषांमध्ये वचनांचे एकवचन व बहुवचन असे दोनच प्रकार आढळतात. एका वस्तूच्या वा व्यक्तीच्या निर्देशासाठी एकवचन तर एकापेक्षा अधिक वस्तूंच्या वा व्यक्तींच्या निर्देशासाठी बहुवचन वापरले जाते. परंतू याबाबतीत संस्कृतमध्ये मात्र थोडा वेगळेपणा आहे. येथे एकवचन, द्विवचन व बहुवचन अशी तीन वचने आहेत. त्यामुळे क्रियापदाच्या वचनांची पण तीन रुपे आढळतात.

कर्ता - आपण नेहमी स्वत:बद्दल किंवा प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीशी अथवा तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबद्दल, वस्तुबद्दल बोलत असतो. विधान करत असतो. क्रियापदाच्या रुपावरुन तो क्रिया करणारा कर्ता कोण आहे हे समजू शकते. ज्यावेळी मी, आम्ही दोघे किंवा आम्ही सर्वजण यापैकी कोणताही कर्ता असतो तेव्हा त्याला `प्रथमपुरुषी कर्ता 'असे म्हणतात. जेव्हा तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्वजण यापैकी कोणताही कर्ता असतो तेव्हा त्याला `द्वितीयपुरुषी कर्ता 'असे म्हणतात व जेव्हा तो (पुंलिंग), ती (स्त्रीलिंग), ते (नपुंसकलिंग) व त्यांची द्विवचने आणि बहुवचने यापैकी कोणताही कर्ता असतो तेव्हा त्याला `तृतीयपुरुषी कर्ता ' असे म्हणतात. हीच गोष्ट खालील तक्त्यावरुन अधिक स्पष्ट होईल.

 

  एकवचन द्विवचन बहुवचन
प्रथम पुरुष अहम् आवाम् वयम्
  (मी) (आम्ही दोघे) (आम्ही सर्वजण)
द्वितीय पुरुष त्वम् युवाम् यूयम्
  (तू) (तुम्ही दोघे) (तुम्ही सर्वजण)
तृतीय पुरुष (पुंलिंग) स: तौ ते
  (तो) (ते दोघे) (ते सर्वजण)
तृतीय पुरुष (स्त्रीलिंग) सा ते ता:
  (ती) (त्या दोघी) (त्या सर्वजणी )
तृतीय पुरुष (नपुंसकलिंग) तद् ते तानि
  (ते) (ती दोघे) (ती सर्वजण)

 

Hits: 5619
X

Right Click

No right click