संस्कृत परिचय भाग १

संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषा तसेच प्रमुख विदेशी भाषांचे मूळ किंवा उगमस्थान आहे. प्राचीन काळी भारतात संस्कृत भाषा बोलली जात असे.या भाषेतच वेदवाङ्मय, रामायण, महाभारत, विविध शास्त्रीय ग्रंथ, काव्य, नाटके, कथा इत्यादी विपुल साहित्य निर्माण झाले. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
पण ही संस्कृत भाषा फार अवघड, क्लिष्ट आहे अशी एक समजूत आहे. अर्थात त्यात काही तथ्य नाही. कारण असे की कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंवा चष्मा जसा असतो त्यावर ते अवलंबून असते. हिरव्या चष्म्यातून पाहिले तर हिरवे दिसते आणि लाल चष्म्यातून पाहिले तर लाल दिसते.
जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांच्या भाषा वेगवेगळया आहेत. सर्वजण एकमेकांशी बोलतात. आपल्या मनातले विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी हावभाव, हातवारे, बोलीभाषा तसेच लेखनाचाही वापर केला जातो. सर्व भाषांची लेखनाची पद्धत म्हणजेच लिपी सारखी नसते. कुणाची चित्रलिपी, कुणाची देवनागरी, कुणाची रोमन तर कुणाची आणखी काही. शिवाय प्रत्येक भाषेची बोलण्याची ढब, उच्चारपद्धती निराळी असते. आपण लहानमोठया वाक्यांचा वापर करून, आवाजातील चढउतारांचा वापर करून आपले म्हणणे इतरंसमोर मांडू शकतो. जे बोलण्याचे तेच लेखनाचे. जसे बोलतो तसे लिहूही शकतो.
स्वर व व्यंजने
संस्कृतची लिपी देवनागरी आहे. आपली मराठीचीही तीच लिपी असल्याने तिची मूळाक्षरेसुद्धा सारखीच आहेत. संस्कृतमध्ये एकूण ४६ मूळाक्षरे आहेत. त्यात स्वर व व्यंजने असे दोन भाग पडतात.
१. स्वर - ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्यांना `स्वर' म्हणतात. स्वर एकूण १३ आहेत.
अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ लृ ए ऐ ओ औ.
`अं' म्हणजे `अनुस्वार' व `अ:' म्हणजे `विसर्ग' हे केवळ स्वरांच्या आधारानेच येतात. म्हणून त्यांना `स्वरादी वर्ण' किंवा `स्वराश्रित' असे म्हणतात.
र्‍हस्व, दीर्घ व संयुक्त असे स्वरांचे तीन प्रकार आहेत.
र्‍हस्व स्वर - अ, इ, उ, ऋ, लृ
दीर्घ स्वर - आ, ई, ऊ, ऋ
संयुक्त स्वर - ए, ऐ, ओ, औ
(दोन स्वरांचा मिळून संयुक्त स्वर तयार होतो.)
(उदा. अ + इ = ए, अ + ए = ऐ, अ + उ = ओ, अ + ओ = औ)
२. व्यंजने - ज्यांचा उच्चार स्वरांच्या मदतीशिवाय होत नाही त्यांना `व्यंजने' म्हणतात.
व्यंजने एकूण ३३ आहेत.
त्यांचे पाच वर्ग पाडण्यात आले आहेत.
क वर्ग - क् ख् ग् घ् ङ्
च वर्ग - च् छ् ज् झ् ञ्
ट वर्ग - ट् ठ् ड् ढ् ण्
त वर्ग - त् थ् द् ध् न्
प वर्ग - प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व् श् ष् स् ह् ही आठ व्यंजने सुटी ठेवली आहेत.
प्रत्येक वर्गात पाच व्यंजने येतात. (लक्षात ठेवायला सोपी म्हणून संस्कृत व्याकरणकार `पाणिनी' याने व्यंजनांची वर्गवारी केली आहे.) प्रत्येक वर्गातील पहिल्या दोन व्यंजनांना `कठोर व्यंजने' म्हणतात तर प्रत्येक वर्गातील पुढच्या तीन व्यंजनांना `मृदू व्यंजने' म्हणतात. प्रत्येक वर्गातील शेवटच्या व्यंजनाचा उच्चार नाकातून होत असल्याने त्याला `अनुनासिक' म्हणतात. य् र् ल् व् ह् ही `मृदू व्यंजनांच्या' तर श् ष् स् ही व्यंजने `कठोर व्यंजनांच्या' यादीत येतात.
अशा ह्या वर्णांच्या मिश्रणातून शब्द बनतात. अनेक शब्दांचे मिळून एक वाक्य बनते. प्रत्येक वाक्यात एखादी तरी कृती सांगितलेलीअसते. ती कृती म्हणजे क्रिया ज्या शब्दातून सांगितली जात त्या शब्दाला `क्रियापद' म्हणतात. ती क्रिया करणारा असतो त्याला `कर्ता' म्हणतात. ज्यावर ती क्रिया केली जाते त्याला `कर्म' असे म्हणतात. म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद आणि त्यांची सजावट करणारे इतर शब्द यांनी मिळून वाक्य बनते. जसे कुटुंबात कर्ती व्यक्ती ही कुटुंबप्रमुख असते. तसे प्रत्येक वाक्यात क्रियापद हे मुख्य असते.

 

Hits: 8551
X

Right Click

No right click