धातुसाधित विशेषणे

धातूंची जशी कालार्थी रूपे वापरात आहेत. तशीच त्यांच्यापासून तयार झालेली नामे, अव्यये व विशेषणे ही पण वाक्यात क्रियावाचके म्हणून वापरली जातात.

धातुसाधित विशेषणे ही मुख्यत: तीन प्रकारची असतात. वर्तमानकालवाचक, भूतकालवाचक आणि विध्यर्थक (भविष्यकालवाचक). शिवाय त्यांचे कर्तरि, कर्मणिप्रमाणे आणखी उपप्रकार पडतात. त्यानुसार त्यांना लागणारे प्रत्ययही वेगळे असतात. विशेषणांचा तक्ता व त्यांचे प्रत्यय खाली दाखविले आहेत. परंतु ते स्वत: तयार न करता असलेली विशेषणे यादीप्रमाणे तयार ठेवणे हे अधिक सोपे जाते. पुन्हा पुन्हा वापर केल्यास ते सहज लक्षात राहते.

धातुसाधित विशेषणे -
१)भूतकालवाचक (क.भू.धा.वि.)-
अ) कर्तरि (`तवत्' प्रत्यय)
आ) कर्मणि (`त' प्रत्यय)

२) विध्यर्थक (क.वि.धा.वि.)
(`य, तव्य, अनीय' प्रत्यय)

३) वर्तमानकालवाचक (व.का.धा.वि.)-
अ) कर्तरि (व.का.धा.वि.) (प.प.)
(`अत्' प्रत्यय)
आ) कर्तरि (व.का.धा.वि.) (आ.प.) (१,४,६,१० गण)
(`मान' प्रत्यय)
कर्तरि (व.का.धा.वि.) (आ.प.) (२,३,५,७,८,९गण)
(`आन' प्रत्यय)
इ) कर्मणि (व.का.धा.वि.)
(`य +मान' प्रत्यय)

१) कर्तरि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे - कोणत्याही धातूला `तवत्' प्रत्यय जोडला असता या प्रकारची विशेषणे तयार होतात. कर्त्याने ती क्रिया भूतकाळात केली असा अर्थ या विशेषणामुळे समजतो.
उदा. पठ् - पठितवत् , क्रीड् - क्रीडितवत् , कृ-कृतवत्
ही विशेषणे नंतर पुंलिंगात भगवत् प्रमाणे, स्त्रीलिंगात ई प्रत्यय जोडून नदीप्रमाणे व नपुंसकलिंगात जगत् प्रमाणे चालतात.

१) सा उच्चै: सुभाषितं पठितवती ।

२) कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे (कर्म.भू.धा.वि.)- मूळ धातूंना `त' प्रत्यय लावून ही विशेषणे तयार केली जातात. काही ठिकाणी `इत' असाही प्रत्यय लावला जातो. तर काही ठिकाणी `त' ऐवजी संधिनियमानुसार द, ध, न, ट, ढ, ण असा बदल होतो.
उदा. गम् - गत् , रच् - रचित , मुच् - मुक्त , लभ् - लब्ध
कर्माप्रमाणे लिंग, वचन, विभक्ती असते व भूतकाल दाखविला जातो.

३) कर्मणि विध्यर्थक धातुसाधित विशेषणे (क.वि.धा.वि.) - एखादी क्रिया करणे योग्य आहे किंवा ती करावी असा अर्थ यातून व्यक्त होतो. त्यासाठी धातूंना `य', `तव्य', `अनीय' हे प्रत्यय लावले जातात. पुंलिंगात `देव'प्रमाणे, स्त्रीलिंगात `माला' प्रमाणे व नपुंसकलिंगात `वन' प्रमाणे चालतात.
उदा. गम् - गम्य, गन्तव्य , गमनीय कृ - कार्य, कृत्य, कर्तव्य, करणीय, सर्वै: नमस्कार: कर्तव्य: । परपीडनं न योग्यम् ।

४) कर्तरि वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषणे - (कर्त. व.का.धा.वि.)
या विशेषणामुळे ती क्रिया करणारा किंवा करणारी असा कर्त्याबद्दलचा अर्थ व्यक्त होतो.
परस्मैपदी धातूंना `आन' (अत्) प्रत्यय लावला जातो.
गम् - गच्छ्+ अत् = गच्छत् - (जाणारा)
दा- यच्छ् + अत् = यच्छत् - (देणारा)
वद्- वद् + अत् = वदत् - (बोलणारा)

ही रूपे तयार करताना धातूच्या अंगाच्या (मूळधातूंना विकरण लागल्यानंतरचे रूप) शेवटचा `अ' व `अन्' प्रत्ययातील `अ' यांचा संधि होऊन `आ' न होता `अ' च राहतो. ही विशेषणे पुंलिंगात भगवत् प्रमाणे चालतात. फक्त या विशेषणाचे प्रथमा एकवचन उदा. `गच्छत्' चे `गच्छान' न होता `गच्छन्' या पद्धतीने होते.
स्त्रीलिंगात `ई' जोडून रूपे तयार केली जातात. १, ४,१० या गणातील धातूंची रूपे होताना `त' पूर्वी `न' चा आगम होतो. ६,२ या गणांना विकल्पाने `न' चा आगम होतो. तर ३,५,७,८,९ या गणात `न' चा आगम होत नाही.

१,४,१० - `न' चा आगम होतो. - गच्छन्ती , हसन्ती
६,२ - विकल्पाने `न' चा आगम होतो. - लिखती / लिखन्ती
३,५,७,८,९ - `न' चा आगम होत नाही. - कुर्वती, चिन्वन्ती , जानती

Hits: 15117
X

Right Click

No right click