संस्कृत भाषा व त्यात असलेले वाङ्मय हे भारतीय संकृतीचे उगमस्थान आहे हे सर्वपरिचित आहेच. वेद हे जगातील प्राचीनतम ग्रंथांपैकी प्रमुख ग्रंथ आहेत. मात्र वेदांच्या काळासंबंधी बरेच मतभेद आहेत. युरोपीय पंडित वेदरचनेचा काळ इ. स. पूर्व एक ते दोन हजार वर्षांच्या दरम्यान असावा असे मानतात तर जुन्या विचारसरणीचे भारतीय विद्वान वेद हे अनादि आणि अपौरुषेय आहेत असे मानतात.

जगत्‌, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप व त्यांचा परस्परसंबंध प्रतिपादन करणे हा उपनिषदांचा प्रमुख विषय आहे. उपनिषदांची ‘तत्वमसि’, ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘सोऽहम्’, ‘अयमात्मा ब्रह्म’ ही चार महावाक्ये आहेत. त्यांचा अर्थ जाणणे व अनुभविणे हे उपनिषदांच्या अध्ययनाचे ध्येय आहे.

१७व्या शतकात शहाजहान बादशहाचा विद्वान पुत्र दारा शिकोह याने उपनिषदांचे फारसी अनुवाद करविले. १८व्या शतकामध्ये आक्वेतिल दुपेरॉं या युरोपीय विद्वानाने त्या फारसी भाषांतरावरूनच लॅटिन भाषांतर केले. त्यानंतर इंग्रजी, जर्मन वगैरे अनेक युरोपीय भाषांमध्ये उपनिषदांची भाषांतरे केली गेली. "उपनिषदांच्या अध्ययनाने माझ्या अंतःकरणास चिरशांती मिळाली. ही चिरशांती माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत हृदयातून दूर होणार नाही." हे जर्मन तत्व शोपेन हाउएर यांचे उद्‌गार प्रसिद्ध आहेत.

उपनिषदांचा मुख्य सिद्धान्त काय असावा याविषयी प्राचीन काळातल्या मोठमोठ्या विद्वानांमध्ये तीव्र मतभेद आहेत.

१) श्री शंकराचार्य - अद्वैतवाद (इ. स. ८वे शतक/केरळ)
२) श्री रामानुजाचार्य - विशिष्टाद्वैतवाद (इ. स. ११वे शतक/आन्ध्र)
३) श्री वल्लभाचार्य - विशुद्धाद्वैतवाद (१५-१६वे शतक/उत्तरप्रदेश)
४) श्री निंबार्काचार्य - द्वैताद्वैतवाद (१२वे शतक पूर्वार्ध/उत्तरप्रदेश)
५) श्री मध्वाचार्य - द्वैतवाद (१३वे शतक/कर्नाटक)

या थोर आचार्यांनी अशाप्रकारे वेगवेगळे सिद्धान्त सांगितले असले तरी, मोक्ष हेच मानवी जीवनाचे ध्येय असून, त्याची प्राप्ती आत्म नानेच होते याबाबत त्यांचे एकमत आहे. तसेच वेदान्तग्रंथांचे श्रवण, मनन, निदिध्यासन व योगसाधना हाच ज्ञानप्राप्तीचा उपाय आहे हे सर्वांना मान्य आहे.

Hits: 519
X

Right Click

No right click