Ref: Newspaper Daily Pudhari Sept.11, 2017

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधाननिर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता आणि तत्कालीन मुस्लिम नेते आणि संविधान समिती सदस्य नाझीर हुसेन यांनी हा प्रस्ताव उचलून धरला होता, अशी माहिती भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी दिली.

आज नागपुरात प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. वर्णेकर जन्मशताब्दी समितीचे स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, संविधान निश्‍चित करताना संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे, असा आक्षेप कोणीही घेतला नाही. तर ती एकतेची भाषा आहे, असे यावेळी अनुमोदन देणार्‍यांनी म्हटले होते.  मात्र, त्यावेळच्या राजकारणामुळे संस्कृतचा पराभव झाला, याबद्दल खेद व्यक्त करून जर याचवेळी संस्कृतला राष्ट्रभाषा हा दर्जा मिळाला असता, तर आज या देशात ज्ञानाचे भंडार खुले झाले असते.

संस्कृतचा अर्थ हा फक्त ब्राह्मणांनी पूजेत मंत्र म्हणणे असा घेतला जातो. मात्र, हे चुकीचे आहे. आज संस्कृतमध्ये ज्ञानाचा महासमुद्र आहे. आयुर्वेद वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, पशुशास्त्र, नाट्यशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण अशा विविध विषयांवर संस्कृतमध्ये प्रचंड माहिती उपलब्ध असून, त्यावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले. आज देशात दोन कोटींपेक्षा अधिक प्राचीन संस्कृत पोथ्या उपलब्ध असून, त्यांचे संगणकीकरण करणे आणि त्यावर संशोधन करणे ही आजची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या देशात संस्कृतची विद्यापीठे अनेक आहेत. मात्र, या विद्यापीठांची अवस्था अतिशय वाईट आहे, आज संस्कृतला चांगले शिक्षकही मिळत नाहीत. याबद्दल खंत व्यक्त करत ही परिस्थिती बदलायची असेल तर संस्कृत शिक्षण अनिवार्य करण्याची गरज आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडलेले मत पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज असल्याचे डॉ. जोशींनी आग्रहाने सांगितले. संस्कृतचे मार्केटिंग व्हावे, असे म्हटले जाते याकडे लक्ष वेधत डॉ. जोशी म्हणाले की, संस्कृत हा काही मार्केटिंगचा विषय नाही, तर अभ्यासाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. अभ्यास आणि संशोधन करून संस्कृतला अर्थकारी बनवा, हीच प्रज्ञाभारतींना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.

संस्कृतबाबत जनसामान्यांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत. याकडे लक्ष वेधत ते दूर व्हायला हवेत, अशी आग्रही मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केली. संस्कृतला लोकाभिमुख करून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवले पाहिजे. 

Hits: 268